केनवड : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूध व औषधांविरोधातील कारवाईला मोठा वेग आला आहे. राज्यभर सुरू असलेल्या या धडक मोहिमेचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटताना दिसत असून, रिसोड तालुक्यातील केनवड गावासह परिसरातील अनेक हॉटेल्स, दूध डेअऱ्या आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांनी अचानक शटर डाऊन केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
केनवड बसस्थानक परिसरात आणि मुख्य बाजारपेठेत अनेक हॉटेल्स दिवसभर बंद असल्याचे दिसून आले. यामुळे परिसरात नेहमीची वर्दळ कमी होऊन शुकशुकाटाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दूध डेअऱ्याही बंद असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. दरम्यान, किराणा दुकानांमधून सुट्या खाद्यतेलाची विक्रीही जवळपास थांबली असल्याचे दिसून येत आहे.
FDA विभागाकडून राज्यभर सुरू असलेल्या तपासणी मोहिमेमुळे व्यावसायिकांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि भेसळीच्या शक्यतेबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या कठोर कारवाईच्या भीतीमुळे अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानाची शटर डाऊन केल्याचे दिसून येत आहे. या घडामोडींमुळे ग्राहकांमध्येही विविध चर्चांना उधाण आले आहे. "आतापर्यंत आपण नेमके काय खात होतो?", "दूध, पेढे, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत होती का?" असे प्रश्न अनेक नागरिक उपस्थित करत आहेत. काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईमुळे अन्नसुरक्षेबाबत जनजागृती वाढल्याचेही चित्र दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, अनेक हॉटेल्स आणि दूध डेअऱ्या बंद असताना काही मिष्ठान्न भंडारे नियमितपणे सुरू असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी एक प्रश्न चर्चिला जात आहे. "जर काही आस्थापने सुरू आहेत, तर त्या ठिकाणी भेसळ होत नाही का?" असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, गावातील नागरिकांमध्ये या परिस्थितीची तुलना थेट लॉकडाऊनशी केली जात आहे. अचानक बंद झालेली दुकाने, कमी झालेली वर्दळ आणि निर्माण झालेली शांतता पाहून अनेकजण "लॉकडाऊन लागलं की काय?" अशा आश्चर्यकारक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

0 Comments