Ticker

6/recent/ticker-posts

बार्शीटाकळी तहसीलदारांना खरंच तहसील कार्यालय चालविता येते काय?; नागरिकांचा सवाल

 



प्रदीप गावंडे 


बार्शीटाकळी -बार्शीटाकळी तहसील कार्यालयाच्या कारभारावर नागरिकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, "तहसीलदारांना खरंच तहसील कार्यालय चालविता येते काय?" असा संतप्त सवाल आता तालुक्यातून उपस्थित होत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ, महसूल विषयक कामे, दाखले, परवाने तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचे प्रमुख केंद्र असलेल्या तहसील कार्यालयातील व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे चित्र दिसून येत आहे.


तहसील कार्यालयामध्ये महसूल विभागासह विविध शासकीय शाखा कार्यरत आहेत. मात्र कार्यालयात येणाऱ्या अनेक नागरिकांचे म्हणणे आहे की, संबंधित कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्रे दिसून येत नाहीत. त्यामुळे कर्मचारी कोण आणि बाहेरील व्यक्ती कोण, हे सर्वसामान्य नागरिकांना ओळखणे कठीण जात आहे. शासनाच्या निर्देशांचे पालन होत नसल्याचा आरोप यानिमित्ताने नागरिकांकडून करण्यात येत आहे.


विशेष म्हणजे तहसील कार्यालय परिसरात दलाल सक्रिय झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अनेक कामांसाठी थेट कार्यालयीन प्रक्रियेऐवजी काही मध्यस्थ व्यक्ती नागरिकांशी संपर्क साधत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


तालुक्यातील काही नागरिकांचे म्हणणे आहे की, तहसीलदार रवींद्र काशीकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयीन कामकाजामध्ये अपेक्षित सुधारणा झालेली दिसून येत नाही. उलट अनेक प्रशासकीय बाबींमध्ये दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. तहसील कार्यालयातील शिस्त, नियंत्रण व जनतेशी संवाद या बाबतीत प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे.


सध्या तालुक्यात घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबतही अनेक तक्रारी समोर येत आहेत. काही भागात सिलेंडर वितरणात अडचणी निर्माण झाल्याची चर्चा असून, यावर स्थानिक प्रशासनाने प्रभावी नियंत्रण ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या प्रश्नावरही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना दिसून येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.


तहसील कार्यालय हे सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्याचे केंद्र मानले जाते. परंतु याच कार्यालयाबाबत सातत्याने तक्रारी समोर येत असतील, दलाल सक्रिय असल्याची चर्चा होत असेल आणि नागरिकांना प्रशासनाबद्दल नाराजी वाटत असेल तर ही बाब गंभीर मानली जात आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बार्शीटाकळी तहसील कार्यालयाच्या कारभाराची सखोल चौकशी करून वास्तव परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी आता तालुक्यातून होत आहे.


दरम्यान, नागरिकांकडून होत असलेल्या आरोपांबाबत तहसील प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, प्रशासन याबाबत काय स्पष्टीकरण देते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments