काँग्रेसमधिल गटबाजी चव्हाट्यावर...
दोन बड्या नेत्याच्या गटात थेट हाणामारी,
संदीप राठोड
विशेष बातमी
खामगांव :- येथे महाविकास आघाडीची उध्दव ठाकरेंची सभा संपताच काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व काँग्रेस सेवादालचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यात हाणामारी झाल्याची घटना रविवारी (२१ एप्रिल) रात्री घडली. या घटनेनं काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. आघाडीच्या नेत्यांमधील मतभेद असे चव्हाट्यावर येत असतील तर मतदारांसमोर कसं जायचं असा प्रश्न आता कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ रविवारी खामगाव येथील जे.व्ही. मेहता महाविद्यालयाच्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, व काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील व स्थानिक महाविकास आघाडीचे नेते मंचावर उपस्थित होते. उध्दव ठाकरे यांचे भाषण संपताच नेते आपल्या मार्गाने निघाले.
दरम्यान काही वेळातच खामगाव मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा सभास्थळावरून बाहेर पडत असताना समोरून काँग्रेस सेवादालचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांची गाडी तेथून आली. दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली. काही वेळाने या शाब्दिक वादाचे रुपांतर हाणारीत झाले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या अंगावर धावून जात हात उगारला. तसेच त्यांच्या गाडीच्या काचा देखील फोडल्या. या घटनेमुळे सभास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण सोडविले. या घटनेमुळे काँग्रेस मधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
0 Comments