Ticker

6/recent/ticker-posts

उकिरड्याला आग; धुरामुळे नागरिक व वाहनचालकांना त्रास, वाहतूक काही काळ ठप्प



रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद्द (जि. वाशिम) येथे पुलगाव–जालना राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उकिरड्याला रविवारी (दि. 29 मार्च) सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघून संपूर्ण गावात पसरल्याने स्थानिक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास सहन करावा लागला, तर महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांसमोर दृष्य अस्पष्ट झाल्याने अपघाताची परिस्थिती निर्माण झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गावालगत असलेल्या शेतात गव्हाचा काडीकचरा व शेतीतील धुरे पेटविण्यात येत होते. दरम्यान, अचानक वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या आगीने उग्र रूप धारण केले आणि शेजारील उकिरड्यापर्यंत ती पोहोचली. उकिरड्यात विविध कचरा असल्याने आग भडकली आणि त्यातून मोठ्या प्रमाणात काळा धूर निघू लागला. काही क्षणांतच हा धूर गावभर पसरला.

धुराच्या दाट पडद्यामुळे पुलगाव–जालना राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अनेक वाहनचालकांना समोरील रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने त्यांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागली. काही ठिकाणी वाहनं घसरल्याच्या घटना घडून किरकोळ दुखापती झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन ग्रामस्थांनी तात्काळ अग्निशामक दलाला संपर्क साधला. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगर परिषदेकडून एक अग्निशामक बंब तसेच वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नगरपंचायतीकडून दुसरा बंब घटनास्थळी त्वरित दाखल झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, उकिरड्यातील कचऱ्यामुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात सुरूच होते, त्यामुळे आग पूर्णपणे विझवण्यासाठी काही वेळ लागला.

अखेर अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांमुळे आग व धुरावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या कार्यात ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे तलाठी आखाडे घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वेळेत मिळालेल्या प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला. आग नियंत्रणात आणणाऱ्या अग्निशामक दलाचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शेतातील कचरा जाळताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments