Ticker

6/recent/ticker-posts

मोहना खुर्द येथील स्मशानभूमी शेडची दुरवस्था; पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी

 




 अनिल राठोड 



डोणगाव- मेहकर तालुक्यातील मोहना खुर्द येथील स्मशानभूमीतील शेडची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सद्यस्थितीत हे शेड अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, आगामी पावसाळा तोंडावर असल्याने त्यापूर्वी या शेडची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी आता स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे.

मोहना खुर्द येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी उभारण्यात आलेले शेड पूर्णपणे निकामी झाले आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत अंत्यविधी करताना नागरिकांना आणि मृताच्या नातेवाईकांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. शेड दुरुस्तीअभावी अनेकवेळा भर पावसात उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ गावकऱ्यांवर येते.

मूलभूत सुविधांचाही अभाव

शेडच्या दुरवस्थेसोबतच या स्मशानभूमीत इतर अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. येथे पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही, तसेच विजेअभावी रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना अंधाराचा सामना करावा लागतो. मुख्य रस्त्यापासून स्मशानभूमीपर्यंत येणारा रस्ताही अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. त्यामुळे चिखलातून अंत्ययात्रा काढावी लागते.

प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी या जीर्ण शेडची तातडीने दुरुस्ती करावी. तसेच रखडलेला रस्ता पूर्ण करून पाणी, विजेसह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मोहना खुर्द येथील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments