गजानन सरकटे
देऊळगाव राजा, प्रतिनिधी : आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते तसेच वंचित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांच्या सामाजिक न्यायासाठी सातत्याने कार्य करणारे भाई दिलीप ब्रम्हा खरात यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.
दिल्ली येथे १३ जून रोजी आयोजित विशेष समारंभात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक परिवर्तन, जनजागृती आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे भाई खरात यांनी दीर्घकाळ वंचित समाजघटकांच्या हक्कांसाठी प्रभावी कार्य केले आहे. शिक्षणाचा प्रसार, सामाजिक समता आणि भारतीय संविधानातील मूल्यांची जपणूक व प्रचार यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत अमेरिकास्थित औसा युनिव्हर्सिटीकडून त्यांना मानद डॉक्टरेट पदवी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार दिल्लीतील समारंभात PPIIT च्या वतीने त्यांना ही पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
भाई खरात यांना मिळालेल्या या प्रतिष्ठित सन्मानामुळे बुलडाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. देऊळगाव राजा तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सामाजिक, शैक्षणिक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
0 Comments