Ticker

6/recent/ticker-posts

जिंतूरमध्ये चार दिवसांपासून गुटखा गायब; व्यसनाधीनांची भटकंती वाढली

 तुकाराम मुंढे इफेक्ट!

कारवाईच्या धास्तीने पानटपऱ्या, किराणा दुकानदारांकडून गुटखा-खर्रा विक्री बंद; नागरिकांकडून स्वागत


भागवत चव्हाण 


जिंतूर : राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा, सुगंधित तंबाखू व इतर प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेचा परिणाम आता जिंतूर तालुक्यातही स्पष्टपणे दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिंतूर शहरासह तालुक्यातील अनेक गावांमधील पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि छोट्या विक्रेत्यांकडे गुटखा, खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र आहे.

राज्यभरात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे साठे जप्त करण्यात येत असून संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर संभाव्य कारवाईची धास्ती घेत जिंतूर तालुक्यातील अनेक विक्रेत्यांनी गुटखा विक्री तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

गुटखा अचानक बाजारातून गायब झाल्याने त्याच्या आहारी गेलेल्या अनेक व्यसनाधीनांची चांगलीच गैरसोय होत असून, काहीजण गुटख्याच्या शोधात शहरातील विविध भागांत भटकंती करताना दिसत आहेत. मात्र, या परिस्थितीकडे सामाजिकदृष्ट्या सकारात्मक बदल म्हणून पाहिले जात आहे.

दरम्यान, गुटखा विक्री बंद झाल्याने अल्पवयीन मुले व युवकांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक पालक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी प्रशासनाच्या या कठोर भूमिकेचे स्वागत केले असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.

गुटखा विक्री अचानक बंद झाल्यानंतर आता नागरिकांचे लक्ष या परिस्थितीचा कालावधी किती राहतो याकडे लागले आहे. प्रशासनाची मोहीम कायम राहिल्यास अवैध विक्रीवर कायमस्वरूपी आळा बसणार की काही दिवसांनी पुन्हा पूर्वस्थिती निर्माण होणार, याबाबतची उत्सुकता सर्वसामान्यांमध्ये दिसून येत आहे. जिंतूर तालुक्यात सध्या मात्र "तुकाराम मुंढे इफेक्ट"ची जोरदार चर्चा रंगली आहे.

Post a Comment

0 Comments