Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी आक्रोशाचा एल्गार 18 जूनला मेहकरमध्ये शिवसेनेचा विराट मोर्चा; आ. सिद्धार्थ खरात यांचा सरकारवर हल्लाबोल

 


*आ. सिद्धार्थ खरात यांचा सरकारवर घणाघात; अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत हजारो शेतकरी उतरणार रस्त्यावर*


गजानन सरकटे 


मेहकर, प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला शेतकरी कर्जमुक्तीचा शासन निर्णय हा प्रत्यक्षात कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आणि कर्जवसुलीला चालना देणारा निर्णय असल्याची जोरदार टीका आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारचे अपयश उघड झाले असून त्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने 18 जून रोजी मेहकर येथे विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मेहकर व लोणार येथे आयोजित बैठकीत बोलताना आ. खरात म्हणाले की, सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने देणाऱ्या सरकारने आता त्यांच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. अतिवृष्टीची मदत, पीक विमा, शेतमालाला हमीभाव यांसारखे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. त्यातच कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांवर नव्या अटी-शर्ती लादून आर्थिक भार वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी सरसकट देण्यात आली होती. मात्र नव्या निर्णयात 1 एप्रिल 2019 पूर्वीचे कर्ज वगळण्यात आले असून दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना आधी थकबाकी भरण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे हजारो शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचा दावा त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी 18 जून रोजी सकाळी 10 वाजता मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. या बैठकीस जिल्हा उपप्रमुख प्रा.आशिष रहाटे, तालुकाध्यक्ष निंबाजी पांडव, लोणारचे तालुका‌प्रमुख राजू बुधवंत, युवासेना तालुकाप्रमुख अँड आकाश घोडे, नगराध्यक्ष किशोर गारोळे. महिलाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह लोणार व मेहकर येथील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी व न्यायासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आ. सिद्धार्थ खरात यांनी केले.

Post a Comment

0 Comments