Ticker

6/recent/ticker-posts

कर्तव्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत निष्ठेने कार्य करणारे माझे मुख्याध्यापक — आदरणीय पंजाबराव खराटे सर

 




गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश,

अंधारात आशेचा नवाच श्वास...

कधी शब्दांनी, कधी स्पर्शांनी घडवतात,

आपल्यातली 'माणूसपणाची' खास...


"शाळा म्हणजे मंदिर आणि शिक्षक म्हणजे त्या मंदिरातील पुजारी" अशीच भावना माझ्या बालमनात रुजवणारे माझे आदरणीय मुख्याध्यापक पंजाबराव खराटे सर यांचा सेवापूर्तीचा दिवस म्हणजे एक संमिश्र भावना घेऊन आलेला क्षण. एकीकडे त्यांच्या सेवानिवृत्तीचा आनंद तर दुसरीकडे, एका प्रेरणादायी पर्वाचा शेवट.मी माझं प्राथमिक शिक्षण आमच्या पिंपरी सरहद्द गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेतलं. त्या काळात सर हे त्या शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांचा 38 वर्षांचा प्रदीर्घ सेवापर्यंतचा प्रवास, शिक्षण क्षेत्रातील एक दीपस्तंभ म्हणून उभा राहिला. शिक्षकी पेशात त्यांनी केवळ काम केलं नाही, तर त्याला एक मिशन म्हणून जगलं.खराटे सरांनी 31 जुलै 2025 रोजी आपल्या सेवेचा शेवटचा दिवस गाठला, पण त्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं कर्तव्याप्रती असलेलं निष्ठावान वर्तन अतुलनीय होतं. त्यांनी त्या दिवशी देखील नेतंसा येथील शाळेला भेट देऊन, आपल्या सेवाकाळातील अंतिम स्वाक्षरी नोंदवली. आणि जणू आपली कर्तव्ययात्रा संपूर्ण केल्याचं जाहीर केलं.

त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त 2 ऑगस्ट रोजी केनवड येथे मातोश्री लॉन्समध्ये आयोजित केलेल्या सत्कार समारंभात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी ‘आठवणीतील शाळा’ हे पुस्तक त्यांना भेट देण्यात आलं. तो क्षण त्यांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये साठलेला होता — कृतज्ञतेचा, समाधानाचा आणि शाळेवरील अथांग प्रेमाचा.खराटे सरांची कारकीर्द एका शिक्षक म्हणून सुरू झाली आणि पुढे ते मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी पं. स. रिसोड यांसारख्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडत गेले. पण त्यांच्या हृदयात कायम 'शाळा' आणि 'विद्यार्थी'च होते.माझ्या बालपणी जेव्हा मी शाळेत होतो, त्यावेळी माझे वर्गशिक्षक आदरणीय सौ. बोंडगे मॅडम, पिंपरकर मॅडम, गाढवे सर, जुनघरे सर, फुले सर, सैवाले सर — यांनी मला अक्षरओळख शिकवली, जीवनाचे मूलमंत्र दिले. आणि यांच्यावर मार्गदर्शन करण्याचं कार्य खराटे सरांनी अतिशय प्रेमाने आणि शिस्तबद्धपणे केलं.


त्या घंटानादात आमचं बालपण वसत होतं,

आणि शिक्षकांच्या डोळ्यात आमचं भविष्य घडत होतं...

शिस्त, प्रेम आणि शिक्षण यांचं मिश्रण होतं,

आमच्या शाळेचं ते एक सुवर्ण पर्व होतं...


त्या वेळच्या शाळेची शिस्त आजही मनात घर करून आहे. साडेदहाची शाळा, त्याआधीची पहिली बेल, नंतर प्रार्थना आणि वृत्तपत्रातील ठळक बातम्यांची विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती — हे सर्व अनुभव शाळेचं एक वेगळंच आणि समृद्ध रूप आमच्या मनात निर्माण करायचे. शाळेत थोडाही उशीर झाला, तर गेट बंद आणि उशिरा आलेल्यांना समज. ड्रेस कोड पाळला नाही तर कारण विचारलं जायचं. पण या कठोरतेच्या आड लपलेलं सरांचं प्रेम, काळजी, आणि आपुलकी आम्हाला नेहमी जाणवायची.खराटे सरांच्या स्वभावात शिस्त होती, पण तिच्याबरोबर प्रेम, सहृदयता आणि विचारशीलता देखील होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शाळेने प्रगतीचा पल्ला गाठला. जेव्हा त्यांनी प्रथम आमच्या गावातील पिंपरी शाळेत जॉईन केलं, तेव्हा केवळ तीनच वर्ग कार्यरत होते आणि इतर इमारत उध्वस्त अवस्थेत होती. त्यांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या मदतीने त्या इमारतींना सुस्थितीत आणलं. आणि या गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला सातवीपर्यंत दर्जेदार शिक्षण मिळावं, यासाठी जणू त्यांनी आयुष्य पणाला लावलं.या कार्यकाळात त्यांनी शिक्षकांना एकत्र ठेवून कुटुंबासारखे जपले. आम्हा विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी केवळ अभ्यासच नव्हे तर सामाजिक जाण, मूल्यशिक्षण आणि देशाची ओळख निर्माण केली.खराटे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या त्या काळात, पिंपरी शाळा ही एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जायची. पण हळूहळू गावात पैसा वाढला आणि लोकांनी आपल्या मुलांना लवकरच खाजगी शाळांमध्ये पाठवायला सुरुवात केली. त्यामुळे गावच्या शाळेत फक्त गरीबांचेच मुलं राहू लागली. एकीकडे हे वास्तव पाहताना मन विषण्ण होतं. कारण ही शाळा एकेकाळी ज्ञानाचा प्रज्वलित दीप होती, आज तिथे शांततेचं साम्राज्य.

शब्द देता येत नाहीत शिक्षकांची थोरवी,

त्यांनी घडवलेले माणूस असतो त्यांच्या कार्याची पुरावी...

सेवा केली शेवटच्या क्षणापर्यंत जिच्यात निष्ठा होती,

असे खराटे सर विरळच होतात, ज्यांच्या आठवणींमध्ये आयुष्य भरतं...

खराटे सरांनी आपल्या सेवेनंतरही या शाळेबद्दलची भावना कधीही कमी होऊ दिली नाही. त्यांनी सत्काराच्या कार्यक्रमात खास सांगितलं — “मी या शाळेतून माझा प्रवास सुरू केला आणि आज सेवानिवृत्तीच्या दिवशी इथे आलो आहे, कारण ही माझी खरी कर्मभूमी आहे.”त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीला क्षम्य मानलं नाही. जर एखादा विद्यार्थी गैरहजर असेल, तर त्याच्यावर लक्ष ठेवून दुसऱ्या दिवशी विचारणा केली जायची. कधी पालकांना बोलावून शाळेशी संवाद साधायचं, यामागे उद्देश फक्त एकच — विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचं महत्व रुजवणं.आमची बॅच खराटे सरांच्या कार्यकाळातील शेवटच्या उंचपुर्‍या विद्यार्थ्यांची बॅच असावी. त्यानंतर अशी उर्जा, तसा शिस्तबद्ध विद्यार्थीवर्ग पुन्हा शाळेला लाभला नाही. हे त्यांच्या भाषणातून आणि आमच्या आठवणींतून वारंवार अधोरेखित होतं.खराटे सरांच्या बाबतीत लिहावं तेवढं कमीच आहे. त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक घटना, प्रत्येक अनुभव, आणि त्यांच्या शिक्षकी जीवनातील प्रत्येक टप्पा हे नव्या शिक्षकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.31जुलै रोजी ते सेवानिवृत्त झाले, पण आमच्या मनात, आठवणीत आणि संस्कारात ते कायमच कार्यरत राहतील.

कर्तव्य, शिस्त, प्रेम, आणि मूल्यांच्या अधिष्ठानावर उभा राहिलेला एक महान शिक्षक — श्री.पंजाबराव भानुदास खराटे सर, तुम्हाला सलाम!



✍🏻फिरोजशाह 

9623132977




Post a Comment

0 Comments