*शेगाव तालुक्यात केस गळती नंतर नखे गळती*
देवचंद्र समदूर
शेगाव तालुक्यातील बोंडगावामध्ये ३महिन्यापूर्वी उद्भभवलेल्या केस गळतीच्या समस्येनंतर आता केस गळती रुग्णांना नखगळतिच्या वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. ६ दिवसापासून असलेल्या या प्रकाराने गावकरी हादरले असून भीतीसदृश्य वातावरण पसरले आहे. बोंडगाव सह इतर ५ गावामधे सुद्धा नख गळती होत आहे. त्यामध्ये बोंडगाव १४, कालवड १३, कठोरा १०, मच्छिंद्रखेड 7, घुई २ अशा नागरिकांमध्ये नखे गळती होत आहे.या गंभीर प्रकाराची दखल घेत आरोग्य विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.बोंड गावात सध्या सुमारे 10 रुग्ण नख गळतीचे असून, आजूबाजूच्या गावांमध्येही अशीच लक्षणं दिसू लागली आहेत. आज बाजू गावात देखील नख गळतीचे रुग्ण आढळल्याने या प्रकाराचा परीघ वाढत असल्याची चिन्हं आहेत.या प्रकाराची माहिती मिळताच आरोग्य विभागाने गावात सर्वेक्षण सुरू केले. यामध्ये डॉ.प्रशांत तांगडे (साथरोग तज्ज्ञ), अनिल बनकर (वैद्यकीय अधिकारी), जितेंद्र तायडे (वैद्यकीय अधिकारी), प्रमोद इंगळे (आरोग्य सहाय्यक), श्रीमती थारकर (आरोग्य सहाय्यिका) व आशा स्वयंसेविका यांचा समावेश होता. त्वचारोग तज्ञ डॉक्टर बालाजी आद्रर यांनीही रुग्णांची तपासणी केली.गावकऱ्यांनी ही बाब शिवसेनेचे शेगाव तालुका प्रमुख यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर रामा पाटील थारकर यांनी हा गंभीर विषय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निदर्शनास आणून दिला असून, या संदर्भात चर्चा देखील झाली आहे. केंद्रीय मंत्री जाधव यांनी याची तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती मदत व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले आहे.
या प्रकारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, प्रथमतः पाणी व पर्यावरणीय घटकांचा सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नख गळती बाधित रुग्णाच्या संपूर्ण शरीराची तपासणी शासन मार्फत मोफत करण्याची मागणी रामा पाटील थारकर प्रशासनास केली आहे.. त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिला असून संशोधन पूर्ण होई पर्यंत नागरिकांची भयभीत न होण्याचे आवाहन केले आहे.
संपूर्ण परिस्थितीवर प्रशासन व आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे आणि लवकरच तपासण्या पूर्ण करून ठोस निदान देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
0 Comments