प्रकाश सुखधाने
मेहकर, दि. 4 मार्च 2026: मेहकर शहराजवळील खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरातील शेतात आढळलेल्या युवकाच्या खुनाचा उलगडा अवघ्या 12 तासांत करत मेहकर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.
आज सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास मेहकर पोलीस स्टेशन येथे माहिती मिळाली की, खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरातील शेतात एका पुरुषाचे मृतदेह पडलेला आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर एस. आलेवार हे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीत हा प्रकार घातपाताचा असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख राहुल भानुदास बाजड (वय 28, रा. जांब आढाव, ता. रिसोड, जि. वाशिम) अशी पटवली. घटनास्थळाचा पंचनामा करून फॉरेन्सिक लॅब, फिंगरप्रिंट तज्ञ आणि डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. तपासासाठी चार स्वतंत्र पथके तयार करून विविध दिशांनी तपास सुरू करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासास मार्गदर्शन केले.
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केनवड (ता. रिसोड, जि. वाशिम) येथून ओम शामराव केनवडकर (वय 36) याला त्याच्या शेतातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. मृतक हा मागील काही दिवसांपासून आरोपीच्या पत्नीला त्रास देत असल्याचा आरोप असून, वारंवार समज देऊनही तो न ऐकल्याने 3 मार्च रोजी त्याला खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरातील शेतात नेऊन दगडाने मारहाण करून खून केल्याची कबुली आरोपीने दिली.
या प्रकरणी फिर्यादी संजय किसन वाघ (रा. जांब आढाव, ता. रिसोड, जि. वाशिम) यांच्या तक्रारीवरून मेहकर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर एस. आलेवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या 12 तासांत गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीस अटक केली.
या जलद आणि प्रभावी कारवाईबद्दल परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू आहे.

0 Comments