महंत जितेंद्र महाराज कडाडले; बंजारा नायक सहविचार सभा संपन्न
जय राठोड
दिग्रस बंजारा समाजात अनादिकालापासून डफडा या पारंपरिक वाद्याकडे आदराने पाहिले जाते. डफड्यातून निघणारे लय-सूर-ताल इतर वाद्यांपेक्षा सरस ठरते. शिवाय डफडा वाद्य हे अखर्चिक आहे. सद्या बंजारा समाजात डीजेचा शिरकाव झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. लग्नात जणू डीजे अनिवार्य असेल, या तोऱ्यात लोक वावरत आहेत. त्यामुळे धन, वेळ, श्रमाचा अपव्यय होत आहे. शिवाय लग्नकार्य विधी वेळेवर लागत नाही. त्यामुळे गोरबंजारा समाजाची अखंड परंपरा व संस्कृती जतन राहावी, याकरिता तांड्यांमधून डीजे पद्धतीला हद्दपार करत समाजाची डफडा वाद्य संस्कृती जिवंत ठेवण्याचे कळकळीचे आवाहन भक्तीधामचे महंत जितेंद्र महाराज यांनी केले.
धर्मपीठ, भक्तिधाम पोहरादेवी येथे नुकतेच संपन्न झालेल्या नायक, कारभारी सहविचार सभेत ते बोलत होते. पोहरादेवीचे महंत कबीरदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत महंत जितेंद्र महाराज यांचा जन्मसोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या चाहत्यांसोबतच समाज बांधवांनी त्यांना जन्मसोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. डीजे पद्धतीमुळे समाजाच्या लोकांना अतिरिक्त खर्चाचा भार सहन करावा लागत आहे. वेळेवर विवाहकार्य होत नाही. अशा अनेक समस्यांचा पाढा त्यांनी वाचला. ज्या तांड्यात डिजे बंदी आहेत. त्या तांड्यातील नायक, कारभारींचा सत्कार त्यांनी आवर्जून केला.
यावेळी महंत कबीरदास महाराज, देवेंद्र महाराज, बाबूसिंग नाईक, डॉ. मधुकर नाईक, डॉ. सुदाम चव्हाण, डॉ. जगदिश राठोड, पुंडलीक नाईक, विलास राठोड, गणेश जाधव, मधुकर नाईक, करतार राठोड, विष्णू आडे, रामराव आडे, सुनिल राठोड, मनोज पातुरकर, विनोद जाधव, श्याम राठोड, श्याम राठोड, गजानन राठोड, किसन जाधव, संतोष जाधव, रोशन चव्हाण यांच्यासह नायक, कारभारी व समाजबांधव उपस्थित होते.
अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागेल
राजपूत भामटा मधून 'भामटा' हा शब्द वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे कळते. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. हा निर्णय तात्काळ परत घ्यावा. अन्यथा आगामी निवडणुकीत राज्य सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागेल, असा इशारा आपल्या आक्रमक शैलीत महंत जितेंद्र महाराज यांनी दिला.
0 Comments