नवल राठोड
देऊळगाव साकरशा:सतत्यपूर्ण परिश्रम करण्याची तयारी असेल, तर जगात अशक्य असे काहीच नाही याचाच प्रत्यय नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जानेफळकरांना आला.सरकारी नोकरी ही दुरापास्त झाली असताना, मोजक्याच सरकारी नोकऱ्या शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यातच खेड्यापाड्यातील होतकरू मुलांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्या इतपत त्यांची आर्थिक ऐपत नाही. महागड्या फीज असलेले कोटा,नांदेड यासारख्या ठिकाणचे क्लासेस ते लावू शकत नाहीत. डीएड व बीएड करून वीस वर्षांपासून अनेक तरुण घरातच आहे. त्यामुळे फौजी होणं
आणि महाराष्ट्र पोलीस होणार हे खेड्यातील मुलांचे स्वप्न बनलं आहे. अशातच स्थानिक जाणेफळ येथील चार होतकरू व मेहनती मुलांनी महाराष्ट्र पोलीस बनण्याचे स्वप्न नुकत्याच झालेल्या परीक्षेत साकार करून दाखवलेले आहे. त्यात जानेफळ येथील सामान्य कुटुंबातील नागेश सुर्वे, धीरज इंगळे, प्रदीप मुरडकर, शुभम फोलाने या मुलांनी हे स्वप्न सत्यात उतरवले आहे. मागील काही वर्षांपासून सातत्याने मेहनत आणि परिश्रम करून त्यांनी हे दिव्य पूर्ण केले आहे. त्याबद्दल जानेफळ आणि पंचक्रोशीतून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0 Comments