केनवड:-मेहकर–मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी सरहद्द येथे 20 मे रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि पिकअप वाहनामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. मृत व जखमी दोघेही मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
मृत युवकाचे नाव राधेश्याम वामन इंगळे (वय 42) असे असून, संतोष शिंदे (वय 40) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही मेहकर तालुक्यातील नागापूर येथे लग्न समारंभासाठी गेले होते. तेथून परत येत असताना पिंपरी सरहद्द येथे त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच 37 यु.7031व पिकअप वाहनाची जोरदार धडक झाली.
अपघात इतका भीषण होता की, राधेश्याम इंगळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर संतोष शिंदे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पिकअप वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र अर्धा ते पाऊण तास उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. अखेर केनवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची 102 रुग्णवाहिका बोलावण्यात आली. 102 रुग्णवाहिकेचे चालक तोफिक मिर्झा यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी युवकाला तातडीने वाशिम येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अपघातानंतर फरार झालेल्या पिकअप वाहन चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

0 Comments