प्रदिप गावंडे
बार्शीटाकळी प्रतिनिधी |
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पिंजरमध्ये प्रशासनाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रेकॉर्डवर ग्रामसेवक म्हणून विजय नवलकर कार्यरत असले, तरी प्रत्यक्षात ते गावासाठी “असून नसल्यासारखे” ठरले आहेत. त्यांच्या बेफिकीर आणि मनमानी कारभारामुळे गावातील सुमारे चाळीस हजार नागरिक अक्षरशः मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत.
ग्रामसेवक नवलकर हे पिंजरमध्ये मुक्कामी राहत नसून, आठवड्यातून एक-दोन वेळा ‘औपचारिक’ हजेरी लावून उर्वरित काळ गायब राहतात, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय कायमच ‘अधिकाऱ्याविना’ चालत असून, कामासाठी येणाऱ्या नागरिकांना दररोज अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. “ग्रामसेवक मिळत नाही, काम होत नाही” हीच पिंजर ग्रामस्थांची रोजची व्यथा बनली आहे.पाण्यासाठी हंबरडा; प्रशासन मात्र मुके-बहिरे पिंजरमध्ये पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले असून, ग्रामपंचायतीकडून होणारा पाणीपुरवठा अत्यंत अपुरा व अनियमित आहे. काही भागांत आठवड्याला एक-दोन वेळाच पाणी येते, तर अनेक वाड्यांमध्ये नळ कोरडे पडले आहेत. महिलांना व वृद्धांना तासन्तास पाण्यासाठी भटकावे लागत आहे. “पाणी म्हणजे जणू काही दान मिळाल्यासारखे” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कार्यालयात खुर्ची रिकामी; विकासकामे ठप्प ग्रामसेवकाच्या सततच्या अनुपस्थितीमुळे ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. जन्म-मृत्यू नोंदणी, विविध दाखले, शासकीय योजनांचे अर्ज, पाणीपुरवठ्याचे नियोजन—सर्वच बाबतीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. नागरिकांना लांबून येऊनही रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याने संताप उफाळून आला आहे.
“जबाबदार कोण?”—ग्रामस्थांचा थेट सवाल “गावाचा कारभार सांभाळणारे अधिकारीच जबाबदारी झटकत असतील, तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. ग्रामसेवक विजय नवलकर यांच्या निष्क्रिय व अडेलतट्टू भूमिकेमुळेच पिंजरची अवस्था दयनीय झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की संगनमत? इतक्या गंभीर परिस्थितीनंतरही पंचायत समिती व जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे. “हे दुर्लक्ष आहे की संगनमत?” असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. ग्रामस्थांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आंदोलनाचा इशारा; संयमाचा अंत जवळ वारंवार तक्रारी करूनही काहीच फरक न पडल्याने ग्रामस्थांचा संयम संपत चालला आहे. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करून ग्रामसेवकावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
“पिंजरला पाणी आणि जबाबदार प्रशासन कधी मिळणार?” आज पिंजरमध्ये केवळ पाण्याचीच नव्हे, तर उत्तरदायी प्रशासनाचीही टंचाई जाणवत आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होण्यापूर्वी प्रशासन जागे होईल का, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

0 Comments