राजु आण्णा अवचार
सुलतानपूर - शहरातील प्रमुख आणि अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीने 28 फेब्रुवारी रोजी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. पक्षाचे ज्येष्ठ नेते महेंद्र पनाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यातील मोठ्या खड्ड्याला पुष्पहार अर्पण करून, अगरबत्ती लावून आणि दीप प्रज्वलित करून विधीवत महाआरती केली. या उपरोधिक आंदोलनाने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले.
“रस्त्यांची दुरुस्ती होत नसेल, तर खड्ड्यांनाच देव मानावे लागेल का?” असा थेट सवाल उपस्थित करत आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. वाहनचालकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडत असून चारचाकी वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.
हा मार्ग शहरातील अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. श्रीराम मल्टी स्पेशालिटी मेडिकल हॉस्पिटल, कॉलेज, विविध शैक्षणिक संस्था, वेदांत आश्रम यांसारखी महत्त्वाची ठिकाणे याच परिसरात आहेत. दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी, हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी आणि भाविक भक्त दर्शनासाठी या रस्त्याचा वापर करतात. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (बुद्रुक शाखा) कडे जाण्यासाठीही हा मुख्य मार्ग आहे. इतक्या वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याची ही दयनीय अवस्था प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करते.
यावेळी महेंद्र पनाड यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले, “एखादा गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? नागरिकांच्या जीवाशी खेळ करणे थांबवा. तातडीने खड्डे बुजवून संपूर्ण रस्ता दुरुस्त करावा. अन्यथा वंचित बहुजन आघाडी अधिक तीव्र आंदोलन छेडेल.”
आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून आता संबंधित विभागाने डोक्याला हात लावून परिस्थितीची गांभीर्याने दखल घ्यावी, त्वरित निधी उपलब्ध करून काम सुरू करावे आणि नागरिकांना सुरक्षित, सुरळीत रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, अन्यथा जनआक्रोश उफाळून येईल, असा इशाराही देण्यात आला.

0 Comments