मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख येथील घटना !
नवल राठोड
देऊळगाव साकरशा -( प्रतिनिधी) जवळच असलेल्या नायगाव देशमुख येथील शेतकरी गजानन पारधी यांचे शेतातील टोळ कांदा फुलांच्या गंजीला अचानक आग लागली.यामध्ये साडेतीन एकरातील कांदा बी जळून खाक झाले असून, जवळजवळ पाच ते सहा लाखाचे वर रुपयाचे नुकसान झाले आहे. ही दुर्दैवी घटना आज दुपार दरम्यान घडली.
मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख येथील शेतकरी गजानन सूर्यभान पारधी यांनी देऊळगाव साकरशा शिवारातील आपल्या साडेतीन एकर शेतात टोळ कांद्याची लागवड केली होती. विशेष म्हणजे कांद्याचे बियाण्याला क्विंटलमागे ५० हजार रुपयेचे जवळपास अर्थात चांगला भाव असल्याने, नायगाव देशमुख परिसरात टोळ कांद्याची लागवड यावर्षी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी केली आहे. सदर टोळ कांदा काढण्याची सध्या लगबग सुरू आहे. शेतकरी गजानन पारधी यांनी देखील आपल्या शेतातील टोळ कांदा फुलांची कापणी करून शेतात गंजी लावली होती. आज ३ मे रोजी अचानक लागलेल्या आगीत सदर कांदा बियाची फुले जळून खाक झाली. यामध्ये शेतकरी गजानन पारधी यांचे जवळजवळ पाच ते सहा लाखाचे वर रूपयांचे नुकसान झाले आहे. तरी सदर नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी गजानन पारधी यांनी केली आहे. दरम्यान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भास्कर ठाकरे यांनी याबाबत तहसीलदार निलेश मडके, तलाठी बालाजी माने यांच्याशी संपर्क करून नुकसानी बाबतची माहिती दिली. सदर नुकसानीचा तातडीने पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल असे तलाठी बालाजी माने यांनी सांगितले.

0 Comments