न्यायालयीन कामकाजाच्या धावपळीत सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याचा संकल्प
अंकुश राठोड
स्थानिक मेहकर वकील संघ आणि सर्व मुस्लिम बांधव वकीलांच्या वतीने दिनांक ०१.०४.२०२६ रोजी मेहकर वकील संघाचे सभागृहात ‘ईद मिलन’ कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वकील संघाने सामाजिक एकता आणि वकील संघांमधील कौटुंबिक जिव्हाळ्याचे दर्शन घडवून दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जे. जी. निकस उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश श्री.सागर मुंगीलवार तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती गायगोले, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती पाटील व श्रीमती कांबळे तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अनिल अडेलकर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान बोलताना अनेक वक्त्यांनी नमूद केले की, न्यायालय हे केवळ वाद निवारणाचे केंद्र नसून, तिथे काम करणारे विधीज्ञ आणि कर्मचारी हे एका मोठ्या कुटुंबासारखे आहेत. अशा उपक्रमांमुळे कामाचा ताण हलका होऊन परस्परांमधील स्नेह वाढण्यास मदत होते. सर्व धर्मीय विधिज्ञ एकत्र येत साजरी केलेली ही ईद समाजासाठी एकतेचा मोठा संदेश देणारी ठरली. "असे कार्यक्रम सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी काळाची गरज आहेत," असे मत यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अडेलकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे विशेष नियोजन मेहकर वकील संघातील सर्व मुस्लिम वकील बांधवांनी केले होते. त्यांनी उपस्थितांचे स्वागत करून ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि पारंपरिक शिरखुर्मा व फराळाचे वाटप केले. यावेळी मेहकर वकील संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ हिंदू-मुस्लिम बांधवच नव्हे, तर न्यायालयीन कर्मचारी,कारकून बांधव आणि पक्षकारांनीही या आनंदात सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. दिलशाद कुरेशी, ॲड. रमिज खान, ॲड.सय्यद मोईन, ॲड.जमील कुरेशी, ॲड.शोएब खान, ॲड.निसार शेख, ॲड. झेन, ॲड. रोशन पठाण, ॲड.इजरायल कुरेशी, ॲड.वसीम शेख, ॲड.आलियार शेख,ॲड. अकरम कुरेशी व ॲड.शहजाद खान ह्यांनी
विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. रमीज खान तर सूत्रसंचलन ॲड.संजय नवघरे यांनी केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
"एकमेकांच्या श्रद्धांचा सन्मान करणे हेच खऱ्या अर्थाने सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे. आयोजकांनी आयोजिलेल्या या कार्यक्रमाचे विशेष कौतुक व शुभेच्छा."
-श्री.सागर मुंगीलवार
अती.जिल्हा व सत्र न्यायाधीश
मेहकर


0 Comments