Ticker

6/recent/ticker-posts

नागावरून उडी मारत आईने वाचवले लेकरू; येलदरीतील धाडसी माऊलीचे शौर्य



भागवत चव्हाण 

जिंतूर: “आईचं काळज ते आईचंच!” याची प्रचिती देणारी अंगावर शहारे आणणारी घटना जिंतूर तालुक्यातील येलदरी वसाहतीमध्ये शनिवारी सायंकाळी घडली. आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर ओढवलेल्या संकटाच्या क्षणी एका माऊलीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फणा काढलेल्या नागावरून उडी मारत मुलीचे प्राण वाचवले.

येलदरी वसाहतीतील रहिवासी मोनाली रवी जाधव या सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घराच्या मागील बाजूस आपल्या दोन वर्षांच्या मुलगी रेणुका हिला शौचास बसवण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. याच वेळी दबा धरून बसलेला एक विषारी नाग अचानक रेणुकाच्या पायाजवळ येऊन थांबला.

समोरच मृत्यू उभा ठाकल्याचे पाहूनही मोनाली जाधव यांनी क्षणाचाही विलंब न लावता धाडस दाखवले. नाग मुलीकडे झडप घालण्याच्या तयारीत असतानाच त्यांनी चक्क त्या नागाच्या अंगावरून उडी घेतली आणि क्षणार्धात रेणुकाला आपल्या कवेत घेत सुरक्षित ठिकाणी हलवले. या प्रसंगामुळे चिमुकलीचा जीव थोडक्यात बचावला.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. शेजारील प्रवीण मुळी यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाचे अधिकारी व्ही. बी. चाटसे व सर्पमित्र प्रमोद भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेत नागाला पकडले व सुरक्षितरीत्या जंगलात सोडून दिले.

या धाडसी कृतीमुळे मोनाली जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत असून, “लेकरावर संकट आल्यावर आई वाघीण होते,” याचीच प्रचिती या घटनेतून आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. सोशल मीडियावरही या धाडसी माऊलीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments