Ticker

6/recent/ticker-posts

राजकीय घराण्यांची सत्तेत गर्दी, पण विरोधाचा आवाज कोठे?


अहमद अन्सारी 

 पाथरी विधानसभा क्षेत्रात सध्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, एकामागून एक नेते सत्ताधारी पक्षांमध्ये सामील होत आहेत. त्यामुळे सत्तेत राहण्यासाठी नेत्यांची चढाओढ सुरु असताना, लोकशाहीत आवश्यक असलेल्या प्रभावी विरोधी भूमिकेची मोठी पोकळी निर्माण झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपला पाथरी परिसरात एक नवे बळ मिळाले असून, गावोगावातील त्यांचे कार्यकर्ते आता उघडपणे भाजपच्या समर्थनार्थ सक्रिय झाले आहेत.

दुसरीकडे, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा मुस्लिम समाजावर असलेला प्रभाव काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे मुस्लिम मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, सईद खान (शिवसेना शिंदे गट), राजेश विटेकर (राष्ट्रवादी अजित पवार गट) आणि सुरेश वरपुडकर (भाजप) हे सर्व नेते सत्ताधारी गोटात सामील असले तरी त्यांच्यात स्थानिक पातळीवर वर्चस्व मिळवण्यासाठी चुरस आहे. तथापि, विरोधी आवाज उठवणारा ठोस नेतृत्व समोर न आल्याने जनताच विरोधकाची भूमिका पार पाडणार का?हा प्रश्न उपस्थित होत आहे.

या सत्ताकेंद्रित घडामोडींचा थेट परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होणार असून, सध्या तयार होत असलेली चतुःपक्षीय रचना निवडणूक रंगत वाढवेल, हे निश्चित. पाथरी तालुक्याचे राजकारण जातीय, सामाजिक आणि गटबाजीवर आधारित राहिले असल्याने मतदारांचा कल कुणाच्या बाजूने झुकतो, हेच अंतिम निकाल ठरवेल.

लोकशाहीत सत्तेपेक्षा प्रभावी विरोध आवश्यक असतो. मात्र सध्या पाथरीत नेत्यांनी आपल्या सोयीनुसार सत्तेची वाट धरल्याने, विरोधाचा आवाज दाबला गेला आहे की हरवला गेला आहे, असा सवाल सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे..







Post a Comment

0 Comments