दारव्हा येथील भरदिवसा घरफोडीचे प्रकरण.
श्याम राठोड
दारव्हा...शहरात भरदुपारी एका किराणा व्यावसायिकाच्या घरी सशस्त्र टोळीने घातलेल्या धडक दरोड्याच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. पोलिसांच्या सखोल तपासानंतर हा गुन्हा बाहेरून आलेल्या टोळीने रचला असला, तरी त्यासाठी मदत केली होती ती घरच्या ओळखीतील 'सावज ओळखणाऱ्या' व्यक्तीनेच... आणि ती व्यक्ती म्हणजे - व्यावसायिकाचाच जुना परिचित. पोलिसांनी अटक केलेल्या नांदेड येथील टोळीला मदत करणारा मास्टरमाइंड म्हणून रवींद्र मोतीराम पोकळे (वय ५०, रा. बारीपुरा, राम मंदिराजवळ, दारव्हा) याचे नाव तपासात समोर आले आहे. रवींद्र हा शहरात प्लॉट खरेदी विक्रीचे काम करत असताना स्थानिक व्यापाऱ्यांच्या ओळखी वाढवत होता विशेष म्हणजे दरोड्याच्या दिवशीपासून तो फरार होता, आणि तपासात दिसून आले की, तो दरोडेखोर टोळीच्या संपर्कातही होता.
फिर्यादी किराणा व्यापारी गणेश काळबांडे यांच्या घरी झालेल्या या धाडसी दरोड्यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला होता. घटनास्थळाची माहिती, घरातील वेळा आणि बाहेरून कोणती हालचाल शक्य असेल, याची सर्व माहिती पोकळे यानेच टोळीला पुरवली होती, अशी कबुलीही तपासात पुढे आली. पोलिसांच्या माहितीनुसार, पोकळे आणि काळबांडे एकाच परिसरात राहतात आणि ओळखीतून विश्वास बसवून त्याने ही गुन्हेगारी योजना रचली. या कटामध्ये त्याचा साथीदार अमरदीप हा देखील सामील असून तो सध्या फरार आहे. पोलिस त्याच्या शोधात आहेत. रवींद्र पोकळे दरोड्याच्या घटनेनंतर पंढरपूर, तुळजापूर या ठिकाणी लपून फिरत होता. पोलिसांनी त्याच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवून अखेर गुरुवारी दारव्हा शहरात दाखल होताच त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याच्याकडून पुढील तपास सुरू असून त्याच्या गुन्ह्याशी संबंधित इतर संबंधांचे धागेदोरे शोधले जात आहेत.
१५पर्यन्त पीसीआर
आरोपीला शुक्रवारी 11 एप्रिल रोजी न्यायालयाचे समक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने त्याची दिनांक 15 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.
0 Comments