@फिरोजशाह
रिसोड : राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी वीज उपलब्ध करून देण्यासाठी ‘मागेल त्याला सौर पंप योजना’ सुरू केली. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर आधारित पंप उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्यांना स्वस्त आणि अखंड वीजपुरवठा मिळेल. मात्र, महाऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात असून आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय पंप मंजूर न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद्द येथील शेतकऱ्यांनी एक ते दोन वर्षांपूर्वी सौर पंपासाठी अर्ज केला होता. अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाऊर्जा कंपनीने त्यांच्या सोलर पंपांना मंजुरी दिली. यानंतर इकॉझिन कंपनीचे कर्मचारी आणि महाऊर्जाचे सर्कल प्रोजेक्ट ऑफिसर प्रणव सोलव यांनी शेतकऱ्यांच्या शेतात सर्वेक्षण करण्यासाठी भेट दिली.परंतु, ज्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या स्रोताजवळ इतर ठिकाणाहून वीजजोडणी केली होती, त्यांना अधिकाऱ्यांकडून सोलर पंप नाकारण्याची धमकी दिली जात आहे.महाऊर्जा अधिकाऱ्यांनी "तुमच्या स्त्रोताजवळ आधीच विद्युत पुरवठा आहे, त्यामुळे नियमानुसार तुम्हाला सोलर पंप मिळणार नाही" असे सांगत शेतकऱ्यांना मानसिक त्रास दिला. मात्र, शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वीच अर्ज केला होता, पण सौर पंप मिळत नसल्याने त्यांना पर्यायी वीजजोडणी करून सिंचन करावे लागले. आता याचाच आधार घेत अधिकाऱ्यांनी आर्थिक तडजोडीचा सूचक इशारा दिल्याचा आरोप आहे.शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, "रिसोड तालुक्यात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण करूनच सौर पंप मंजूर करण्यात आले. पण ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले नाहीत, त्यांना वेगवेगळ्या नियमांमध्ये अडकवले जात आहे."
कर्मचारी शेतकऱ्यांना त्रास देत असतील, तर त्यांना शिवसेना स्टाईल धडा शिकवला जाईल"
या प्रकरणावर युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप मोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "शेतकऱ्यांनी कोणत्याही आर्थिक बाबीला बळी पडू नये. तुम्हाला कोणतीही अडचण येत असल्यास तात्काळ माझ्याशी किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा, आम्ही तुमची समस्या त्वरित सोडवू. जर कंपन्यांचे कर्मचारी शेतकऱ्यांना त्रास देत असतील, तर त्यांना शिवसेना स्टाईल धडा शिकवला जाईल" असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री आणि प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी
शेतकऱ्यांनी सरकारकडे महाऊर्जाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. "एकीकडे सरकार ऊर्जा वाचवण्याचे आणि सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करते, तर दुसरीकडे भ्रष्ट कर्मचारी शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. त्यामुळे ‘मागेल त्याला सोलर पंप योजना’ ही फोल ठरत आहे," असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची तत्काळ दखल घेऊन लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांसाठी अडथळे ठरणाऱ्या जाचक अटी त्वरित रद्द कराव्यात, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
0 Comments