Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शाळेमधील पटसंखेत घसरण


शाळेच्या तुकड्या कमी होण्याच्या मार्गावर

फिरोजशाह 

वाशिम:-पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्याचे अनेक उच्चपदस्थ मंडळी अभिमानाने सांगत असत. काळ बदलला. खासगी शाळांचे पेव फुटले. आता इंग्रजी माध्यमांच्या शाळा खेडोपाडय़ापर्यंत पोहोचल्या. या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळा तग धरत नसल्यामुळे दरवर्षी विद्यार्थी संख्येत घट होत असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळात टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.


रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद्द येथे जिल्हा परिषद शाळेचे एक ते सात वर्ग आहेत. परंतु शाळेची दरवर्षी विद्यार्थी पटसंख्येत घसरण होत आहे. यामुळे येणाऱ्या काही वर्षात शाळेतील काही वर्ग कमी होतात की काय? अशी चिंता गावकऱ्यांना लागली आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनासह शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. येथील सातवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरिता दाखला देण्यात येतो.परंतु त्यासह १ते ६ खालच्या वर्गात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व पालक मुख्याध्यापकांना दाखला देण्याकरिता तगादा लावत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या ही झपाट्याने कमी होत आहेत. मुख्याध्यापक यांनी खालच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दाखला देण्यास मनाई केली असता विद्यार्थ्यांसह पालक हे शिक्षकांना अरेरावी करत असल्याचे देखील निदर्शनात येत आहे. वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पिंपरी सरहद्द येथे सात वर्ग असणे खूप मोठी बाब आहे . हे वर्ग वाढवण्याकरिता पूर्वी लोकप्रतिनिधींनी तसेच गावकऱ्यांनी खूप तारेवरची कसरत केलेली आहे आणि एक ते सात च्या तुकड्या या शासनाकडून मान्य करून आणलेल्या आहेत. परंतु दिवसेंदिवस घटत असलेली विद्यार्थ्यांची पटसंख्या हे  सद्यस्थितीला चिंतेचे कारण बनलेले आहे. यावर ग्रामपंचायत प्रशासन तसेच शिक्षण विभागाने वेळीच योग्य ते पाऊल न उचलल्यास येथील वर्ग तुकड्या या कमी होतील याची चिंता सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

0 Comments