Ticker

6/recent/ticker-posts

केनवड येथे ट्रक–ॲपेची भीषण धडक; दाम्पत्य गंभीर जखमी, मद्यधुंद ट्रकचालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले





केनवड (प्रतिनिधी) : शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील मेहकर–मालेगाव राज्य महामार्गावर केनवड येथील मराठा हॉटेलसमोर दिनांक 6 जुलै रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. मेहकरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या एमएच ४६ एआर ७५४२ क्रमांकाच्या ट्रकने समोरून येणाऱ्या तीन चाकी ॲपेला जोरदार धडक दिली. या अपघातात ॲपेमधील प्रवासी असलेले एक दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून चालकालाही दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, ॲपे चालक हा दररोज मालेगाव, शिरपूर आणि केनवड परिसरातील फळ विक्रेत्यांकडे आंबे व इतर फळांचा पुरवठा करून मेहकरकडे परत जात असतो. रोजच्या प्रमाणे तो आपल्या नियमित मार्गाने प्रवास करत होता. दरम्यान, केनवड येथे दोन प्रवाशांना ॲपेमध्ये बसविल्यानंतर अवघ्या पाचशे मीटर अंतरावर हा भीषण अपघात घडला.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव ट्रकने ॲपेला समोरून जोरदार धडक दिल्यानंतर तो सुमारे ४० ते ५० फूटपर्यंत फरफटत नेला. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, ॲपेचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले.अपघातात गंभीर जखमी झालेल्या दाम्पत्याला पुढील उपचारासाठी वाशिम येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून ॲपे चालकावर मेहकर येथे उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. जखमी दाम्पत्य हे केनवड येथील जावई असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.अपघात घडल्यानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क नागरिकांनी त्याचा पाठलाग करून ट्रक अडविला आणि चालकाला शिरपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ट्रकचालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला नीट उभे राहणेही कठीण जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे या अपघातामागे मद्यप्राशन करून वाहन चालविणे हे प्रमुख कारण असण्याची शक्यता व्यक्त होत असून परिसरात 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शिरपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन ट्रकला आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. तरी पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments