Ticker

6/recent/ticker-posts

तुपटाकळी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीचा 'करिश्मा'


पहिल्याच प्रयत्नात पदरात पाडले मुंबई पोलिसांचे पद                     

जय राठोड 

 दिग्रस जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द, चिकाटी आणि कष्ट उपसण्याची तयारी, ही त्रिसूत्री महत्त्वाची असते. यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करताना अनेक संकटे समोर उभी ठाकतात. मात्र या संकटांना न डगमगता तोंड दिले तर हमखास यश पदरी पडते. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे तुपटाकळी येथील कु. करिश्मा जाधव ही तरुणी होय. मागील एक वर्षापासून केवळ नि केवळ जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर या अल्पभूधारक शेतकऱ्याचे मुलीने अखेर पोलीस दलाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. पोलीस भरतीचे मैदान गाजवत तिची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. 

 करिश्मा नागोराव जाधव, रा. तुपटाकळी असे त्या मुलीचे संपूर्ण नाव आहे. नुकत्याच लागलेल्या मुंबई पोलीस परीक्षेच्या निकालातून तिच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. करिश्माचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा तुपटाकळी या राहत्या गावातच झाले. डॉ. अच्युत अत्तेवार विद्यालयात वर्ग 10 वीमध्ये तिला 87 टक्के मार्क प्राप्त होऊन बुटले महाविद्यालय, दिग्रस येथे वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन वर्ग 12 वीमध्ये 91 टक्के गुण प्राप्त केले. मागील एक वर्षापासून दौडणे, गोळाफेक असे शारीरिक सराव ती इतर मुलींना सोबत घेऊन करीत होती. पोलीस भरती जवळ येताच करिश्माने मोठ्या उत्साहाने पोलीस भरतीचे ग्राऊंड 33 मार्काने काढले. त्यामुळे पोलीस भरती परीक्षेचा मार्ग मोकळा झाला. आणखी जोमाने रात्रंदिवस एक करीत ती अभ्यास करीत होती. मात्र मुळातच जिद्द व चिकाटी अंगी असलेल्या करिश्माने शेवटी परीक्षेत 73 मार्क घेऊन पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळविले. 

आजही भारतात मुलगा- मुलगी यांमध्ये मुलाला प्राधान्य दिले जाते. तशी मानसिकता असणारी अनेक उदाहरणे आपल्या आसपास पाहायला मिळतात. मात्र या वृत्तीला छेद देत करिश्माच्या पालकांनी मुलगी देखील वंशाचे नाव रोशन करू शकते, यासाठी पाठबळ दिले. त्यामुळे तिचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आपल्या यशाचे श्रेय ती आपल्या आई- वडील, भाऊ व तुपटाकळी शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापक राऊत सर, भगत, इंगळे, वाघमारे तथा शिक्षकवृंद व गावकऱ्यांना देते.

Post a Comment

0 Comments